वडोदरा : गुजरात राज्यातील वडोदरा येथे एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोड परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना घडली. येथे असलेल्या नारायण शाळेच्या पहिल्या मजल्यावरील लॉबीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एक मुलगा जखमी झाला. तर इमारतीच्या खाली ठेवलेल्या काही सायकल्सची मोडतोड झाली आहे.
या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून, तो खूपच भीतीदायक आहे. हा व्हिडीओ वर्गात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, शाळांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी वडोदरा अग्निशमन दल सातत्याने दक्षता घेत आहे, मात्र शाळांच्या रचनेबाबत पालिका कोणतीही दक्षता घेत नाही. त्याचाच परिणाम म्हणजे वडोदरातील वाघोडिया रोड परिसरात एक मोठी दुर्घटना घडली.
वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया वाघोडिया दाभोई रिंगरोडवरील गुरुकुलजवळील नारायण शाळेची लॉबी आणि भिंतीचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना काल म्हणजेच १९ जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर काही विद्यार्थी पहिल्या मजल्यावरून खाली पडले. मात्र, या घटनेत आतापर्यंत एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शाळेच्या मधल्या सुट्टीदरम्यान घडली. शाळेच्या मुख्याध्यापिका रुपल शाह यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. "आम्ही अचानकपणे मोठा आवाज ऐकला. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत एका मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. या घटनेनंतर आम्ही इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकणी नेलं" असे रुपल शाह यांनी सांगितले. दरम्यान, दुर्दैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर नगरसेवक अलका पटेल यांनीही शाळेला भेट दिली. यावेळी शाळेची भिंत जीर्ण झाली असून तिचे नूतनीकरण करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने शाळेचे नूतनीकरण केले पाहिजे, असे नगरसेवक अलका पटेल यांनी सांगितले. तर ही दुर्घटना घडल्यानंतर वडोदरा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाने बचावमोहीम राबवली.