ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १९ - 'देशविरोधात बोलणारे असं सेलिब्रेशन करत आहेत जणू काही ते ऑलिम्पिक मेडल जिंकून आले आहेत', अशी टीका अभिनेता अनुपम खेर यांनी केली आहे. आपल्या 'बुद्धा इन ट्राफीक जाम' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जेएनयूमध्ये आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यावर खेर यांनी टीका केली. 'तो जामीनावर बाहेर आहे, त्याचं इतकं भव्य स्वागत करायला तो काही ऑलिम्पिकमधून मेडल जिंकून आलेला नाही' असं खेर बोलले आहेत. 'जो देशविरोधात बोलतो त्याला आपण हिरो बनवून कसं काय सेलिब्रेशन करु शकतो ? त्याने कोणतं ऑलिम्पिक मेडल मिळवले आहे का ? तो जामीनावर बाहेर आहे, तो सचिन, सायना किंवा हनुमंतअप्पा नाही आहे', असं कन्हैय्याचं नाव न घेता अनुपम खेर यांनी टीका केली आहे.
चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही घोषणाबाजी करण्यात आल्या. याअगोदर खेर यांनी परिस्थिती चिघळत असल्याने चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जेएनयू नकार देत असल्याच आरोप केला होता, जो विद्यापीठाने फेटाळला होता. देशात जे काही चुकीचं चालू आहे त्याबद्दल तुम्ही बोलता मात्र टीका करण्याऐवजी देशासाठी तुम्ही काही योगदान दिलं आहे का ? असा सवालही अनुपम खेर यांनी यावेळी विचारला.