नवी दिल्ली : दिल्लीतील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी मंगळवारी जंतरमंतरवर एकत्र येत हिंसाचाराचा निषेध नोंदवला. ‘सीएए’ रद्द करा, दडपशाही थांबवा, हिंसाचाराला चालना देणाऱ्यांना अटक करा अशा मागण्या यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, दिल्ली विद्यापीठ, डॉ. आंबेडकर विद्यापीठ या विद्यापीठांमधील हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.हिंसाचाराच्या घटनेनंतर दिल्लीत शांतता, सलोखा निर्माण व्हावा आणि पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी विविध विद्यापीठांमधील विद्यार्थी मंगळवारी रामलीला मैदानावरून संसदेपर्यंत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आंदोलकांनी दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करताना केंद्र सरकार, सीएएविरोधात घोषणाबाजी केली. आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुचेता डे म्हणाल्या की, सकाळी रामलीला मैदानावर विद्यार्थी जमणार होते. मात्र, पोलिसांनी सकाळपासून १०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारची ही दडपशाही आहे. पोलिसांमार्फत सामान्य जनतेचा आवाज बंद करता येणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्रोही गीतांमधून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. एका विद्यार्थ्याने सांगितले की, हिंसाचार निषेधार्हच आहे. मात्र, भाजपकडून या हिंसाचाराला खतपाणी घालण्यात आले हे नाकारता येणार नाही. सीएए कायद्यावरून मतभेद असताना सरकार चर्चेला तयार नाही. सरकार चर्चा करणार नसेल तर देशात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.>पोलिसांनी केली कारवाईरामलीला मैदानावर मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे १८५ विद्यार्थ्यांना पोलिसांनी सकाळी ११ वाजता ताब्यात घेतले. त्यानंतर विविध भागांतून जंतरमंतरकडे निघालेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखले. एन. साई बालाजी म्हणाले की, आम्हाला अखेरच्या क्षणी मोर्चा काढण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली.
विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध, जंतरमंतरवर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 5:29 AM