हासन : गेल्या तीन वर्षांपासून 100 टक्के निकाल लागलेल्या एका सरकारी शाळेची ही कहाणी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात हातात छत्री धरुन अभ्यास करावा लागतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना. मात्र, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात असलेल्या अराकलगुड गावात असलेल्या एसएसएलसी सरकारी शाळेची ही परिस्थिती आहे.
या शाळेत एकूण आठ खोल्या आहेत. यामधील दोन खोल्यांचा उपयोग कार्यालयीन कामासाठी होतोय. बाकीच्या सहा खोल्यांपैकी तीन खोल्यांमध्ये पावसाची गळती लागल्यामुळे वापर होत नाही. त्यामुळे उरलेल्या तीन खोल्यांमध्ये सुद्धा काही प्रमाणात गळती सुरु आहे. मात्र, या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरु असते. यावेळी विद्यार्थी पावसाचे पाणी अंगावर पडू नये यासाठी छत्रीचा सहारा घेतात.
ही शाळा 50 वर्ष जुनी आहे. त्यामुळे शाळेची इमारत बिकट स्थितीत आहे. पावसाळ्यात शाळेच्या खोलांमध्ये पाणी तुंबते. इतके असले तरी, या शाळेत 168 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये 87 मुले आणि 81 मुली आहेत. गेल्या तीन वर्षांपासून एसएसएलसीमध्ये या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरम्यान, सध्याचे कर्नाटकातील मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि पीडब्ल्यूडीमंत्री एचडी रेवन्ना हे हासन जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या शाळेची दुरुस्ती होईल, अशी येथील लोक आशा लावून बसले आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक शिवप्रकाश यांनी सांगितले की, आमच्याकडे शाळेतील खोल्यांची कमतरता आहे. संबंधित अधिका-यांकडे शाळेची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. गेल्यावर्षी जिल्हा पंचायत सदस्य रेवन्ना यांनी दोन लाख रुपये दिले होते. त्यातून दोन खोल्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. शाळेचे छत कोसळेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी घाबरत आहेत.