शाळा सोडलेल्या महिलेचे पुस्तक विद्यार्थी वाचणार, धनुजा कुमारी यांचा संघर्ष अखेर फळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 09:48 AM2024-08-24T09:48:03+5:302024-08-24T09:48:22+5:30
धनुजा कुमारी नामक ४८ वर्षीय महिला अंबालामुक्कूच्या रविनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करते.
तिरुवनंतपुरम : केरळच्या तिरुवनंतपुरम येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या व गरीब परिस्थितीमुळे शाळा सोडावी लागलेली एक महिला लेखक म्हणून नावारूपास आली आहे. झोपडपट्टीतील जीवन जगताना वाट्याला आलेल्या संघर्षाचे वर्णन या महिलेने आपल्या पुस्तकात केले आहे. ‘चेंगलचूलायिले एन्टे जीविथम’ (चेंगलचूलातील माझे जीवन) असे या पुस्तकाचे नाव असून त्याचा कालिकत विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रात समावेश केला आहे.
धनुजा कुमारी नामक ४८ वर्षीय महिला अंबालामुक्कूच्या रविनगर परिसरातील अरुंद गल्ल्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे काम करते. नववीत असताना गरिबीमुळे तिला शाळा सोडावी लागली. शहरातील चेंगलाचूली नामक झोपडपट्टीत तिने अनेक वर्षे घालवली. अनेक दु:ख वाट्याला आली. मात्र, या सर्व आव्हानांचा सामना करताना धनुजा कुमारी एक लेखक म्हणून समोर आली. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने लिहिलेल्या ‘चेंगलचूलायिले एन्टे जीविथम’ला प्रतिसाद मिळत असून विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे.