लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यूपीएससी परीक्षेत ईशिता किशोरने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ईशिताने सांगितले की, ती परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातून किमान आठ-नऊ तास घरामध्येच अभ्यास करायची. हे यश माझ्या मेहनतीचे फळ आहे.
हवाई दलातील अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या ईशिताने (२६) सांगितले की, आयएएस अधिकारी झाल्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी काम करेल. ती म्हणाली की, मला पहिला क्रमांक मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आता गरिबांच्या प्रगतीसाठी झटणार आहे.
कुटुंब ठामपणे मागेकुटुंबाने सतत प्रोत्साहन दिले. ती म्हणाली की, मला पहिल्या दोन प्रयत्नात परीक्षा पास करता आली नाही तेव्हा माझ्या पाठीशी माझे कुटुंब ठामपणे उभे राहिले. त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यांचे आभार, अशी ती म्हणाली.
इतरांना सल्ला काय? माझ्या वडिलांना त्यांच्या कामातून समाधान मिळत असे. अभ्यास करताना कधीही तास मोजून अभ्यास करू नका, स्वतःचे वेळापत्रक बनवा आणि त्याचे पालन करा. तुमचे प्राधान्यक्रम ठरवा, असे तिने यावेळी सांगितले.
मी घरीच अभ्यास केला. मी रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत अभ्यास करायचे, कारण त्यावेळी कुठेही गडबड नसते, खूप शांतता असल्याने मन लावून अभ्यास करता येतो. - गरिमा लोहिया, बक्सर, यूपीएससीमध्ये द्वितीय क्रमांक
मी लोकांना सांगू इच्छिते की, या परीक्षेसाठी (यूपीएससी) खूप मेहनत घ्यावी लागते; परंतु प्रत्येक माणसामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची क्षमता असते. संयम आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असलेले कोणीही यात उत्तीर्ण होऊ शकते.- प्रसनजीत कौर, श्रीनगर, यूपीएससीमध्ये ११वा क्रमांक