त्रिशूर:केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून धार्मिक बंधुभावाचे मोठे उदाहरण समोर आले आहे. येथील एका इस्लामिक संस्थेमध्ये शिकणारे मुस्लिम विद्यार्थी चक्क हिंदू गुरूंच्या देखरेखीखाली संस्कृत श्लोक आणि मंत्र शिकतात. विशेष म्हणजे, या वर्गात गुरू आणि शिष्यांचे संभाषणही संस्कृतमध्येच होते.
का शिकवले जाते?मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्स (MIC) द्वारे संचालित अकादमी ऑफ शरिया अँड अॅडव्हान्स्ड स्टडीज (ASAS) चे प्राचार्य ओनमपिल्ली मुहम्मद फैझी म्हणतात की, संस्कृत उपनिषद, पुराणे, ग्रंथ इत्यादी शिकवण्यामागचा उद्देश हाच आहे की, विद्यर्थ्यांना इतर धर्मांबद्दल ज्ञान आणि जागरूकता निर्माण झाली पाहिजे.
सर्व संभाषण संस्कृतमध्येमलिक दिनार इस्लामिक कॉम्प्लेक्समधील ASAS मध्ये, विद्यार्थी संस्कृतमध्येच बोलतांना दिसतात. संस्थेचे प्राचार्य म्हणाले की, विद्यार्थ्यांना इतर धर्म, त्यांच्या चालीरीतींची माहिती व्हावी, असे आम्हाला वाटले. परंतु आठ वर्षांच्या अभ्यास कालावधीत संस्कृतसह उपनिषद, शास्त्र आणि वेद यांचा सखोल अभ्यास करणे शक्य होणार नाही.
काय-काय शिकवले जातेया विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान देणे आणि त्यांच्यामध्ये इतर धर्मांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश असल्याचे फैजी यांनी सांगितले. ते म्हणाले की, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना भगवद्गीता, उपनिषद, महाभारत, रामायण यातील महत्त्वाचे भाग आणि गीतेचे श्लोकही शिकवले जातात.