कर्नाटकात पुन्हा रंगणार सत्तेचं 'नाटक'?; भाजपा आमदार काय म्हणतोय बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 09:28 AM2018-12-27T09:28:05+5:302018-12-27T09:29:15+5:30
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यमंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या हालचालींना वेग आला आहे.
बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर सत्तास्थापनेवेळी चांगलाचा राजकीय तमाशा पाहिला मिळाला होता. कर्नाटकात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यानं येडीयुरप्पा यांनी सरकार स्थापन केलं होत. मात्र, केवळ दीड दिवसांतच येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. तर, सर्वात कमी जागा असतानाही जेडीएसच्या कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती. मात्र, आता पुन्हा कर्नाटकमध्ये सत्तेच नाटक रंगणार असल्याचं दिसतंय.
कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यमंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतरच या हालचालींना वेग आला आहे. येथील काँग्रेस अन् जेडीएसचे काही आमदार नाराज आहेत. त्यातच, भाजपा आमदार उमेश कट्टी यांच्या विधानामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील राजकीय वातावरण गढूळ बनल्याचं कट्टी यांच्या विधानानंतर लक्षात येईल. काँग्रेस-जेडीएस पक्षातील 15 नाराज आमदारांच्या मी संपर्कात आहे. जर, ते भाजपात येऊ इच्छित असतील तर त्यांचे स्वागत, असे कट्टी यांनी म्हटले. त्यामुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. उमेश कट्टी हे कट्टर भाजपा समर्थक असून ते 8 वेळा भाजपाच्या तिकीटावर आमदार बनून निवडणूक आले आहेत.
कर्नाटकात पुढील आठवड्यात भाजपा सत्ता स्थापन केरल, असा दावा कट्टी यांनी केला आहे. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी हे वृत्त फेटाळले आहे. भाजपा कुठल्याही काँग्रेस आमदाराच्या संपर्कात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर काँग्रेसनेही उमेश यांचा दावा फेटाळत या काल्पनिक बाबी असल्याचं म्हटलंय. दरम्यान, शनिवारी कुमारस्वामी मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रीपद काढून घेण्यात आलेले आमदार पक्षावर नाराज असून काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.