अहमदाबाद - गुजरातच्या गांधीनगर येथील गावामध्ये एका 17 वर्षीय दलित युवकाला अज्ञात आरोपीने भोसकल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला करण्यात आला. मागच्याच आठवडयात या गावातील दोन दलितांना स्टायलिश मिशी ठेवली म्हणून मारहाण करण्यात आली होती. दरबार समुदायातील काही जणांवर या मारहाणीचा आरोप आहे. दलित तरुणांनी स्टायलिश मिशी ठेवणे या समुदायातील काही जणांना पसंत नव्हते. त्यातून ही मारहाण झाली.
साणंद आणि आसपासच्या गावातील 300 दलित तरुणांनी व्हॉटस अॅपवर मिशीचा डिपी ठेवला आहे. या डिपीमध्ये स्टायलिश मिशी दाखवण्यात आली आहे. मिशीच्या खाली मुकुट आणि त्याखाली मिस्टर दलित लिहीले आहे. या व्हॉटस अॅप डिपीच्या रागातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. नवरात्रीमध्ये आनंद जिल्ह्यातील बोरसाद गावामध्ये मंदिरात गरबा पाहणा-या एका दलित युवकाला बेदम मारहाणीत करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
गुजरातमध्ये दलितांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. मंगळवारी ज्या दलित युवकावर हल्ला झाला तो गांधीनगरच्या लिमबोदारा गावात राहतो. हा युवक शाळेची परिक्षा देऊन घरी परतत असताना मंगळवारी संध्याकाळी 5.30च्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. 25 सप्टेंबर रोजी पियुष परमारवर (24) हल्ला झाला त्यावेळी आपल्यालाही मारहाण करण्यात आली होती असा दावा या 17 वर्षीय युवकाने केला आहे. गावातील दरबार समुदायातील काही जणांनी स्टायलिश मिशी ठेवली म्हणून पियुष परमारला मारहाण केली होती.
गांधीनगरच्या कालोल तालुक्यात लिंबोदरा गावात राहणाऱ्या पीयुष परमार या 24 वर्षीय मुलाने त्याला मारहाण झाल्याचा आरोप केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर सिंह वाघेला, राहुल विक्रम सिंह सेराठिया आणि अजित सिंह वाघेला या तीन जणांच्या विरोधात 26 सप्टेंबर रोजी पोलीसात तक्रार दाखल केली. आरोपींनी तक्रारदार मुलाला शिवीगाळी, मारहाण करत अशी मिशी कशी ठेवू शकतो असा सवाल विचारला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
जेव्हा मी रस्त्याने जात होते तेव्हा मला गोळ्यांचा आवाज ऐकु आला. रस्त्यावर अंधार असल्याने ती लोक कोण ? हे लांबून दिसत नव्हतं. ज्या ठिकाणाहून गोळ्यांचा आवाज आला तिथे आम्ही गेल्यावर आम्हाला दरबार समुदायाची तीन लोक दिसली. त्यावेळी तेथे भांडण होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. या सगळ्या प्रकारानंतर आम्ही घरी पोहचलो तेव्हा ती लोकही आमच्या मागे घरी आली आणि आम्हाला शिवीगाळ करायला लागली. त्यांनी आधी माझा चुलत भाऊ दिगांतला मारहाण केली आणि त्यानंतर मलाही मारहाण केली. दलित असून मिशी कशी ठेवू शकतो? हाच प्रश्न ते मारहाण करणारे मला सारखा विचारत होते, असं पीयुष परमार याने सांगितलं आहे.