सिंगापूर : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी पाचशे आणि हजारांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा निर्णय गुंतवणुकीसाठी सकारात्मक सिद्ध होईल. तसेच त्यामुळे महागाईही कमी होईल, असे त्यांनी म्हटले आहे.मिंटएशियाच्या जागतिक पातळीवरील बँकिंग कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सुब्बाराव म्हणाले की, या निर्णयाचे अनेक चांगले परिणाम होतील. लोकांना रोखीच्या व्यवहारापासून परावृत्त करून इलेक्ट्रॉनिक व्यवहाराकडे वळविण्यासाठी हा निर्णय लाभदायक ठरेल. रोखीच्या अर्थव्यवस्थेकडून कमी रोखीच्या अर्थव्यवस्थेकडे जाण्यास मदत होईल. सुब्बाराव म्हणाले की, या निर्णयाचा परिणाम टिकवून ठेवण्यासाठी काही कठोर उपाययोजना कराव्या लागतील. विशेषत: चलन व्यवस्थापनाबाबत नियम कठोर करावे लागतील. तसेच काळा पैसा पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल. अनेक अनिवासी भारतीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उपकंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश खरा म्हणाले की, या निर्णयाची अंमलबजावणी हे आमच्यासाठी एक आव्हानही आहे. या निर्णयामुळे एटीएममधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच खरेदीसाठी कार्डांचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोखीचा प्रवाह वाढावा यासाठी एसबीआयकडून डेबिट कार्ड स्वाईप मशीनच्या व्हॅन पाठविण्यात येत आहे. बँकांकडे पैशाचा ओघ वाढल्यामुळे येणाऱ्या काळात कर्जाचे व्याजदर कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
सुब्बाराव यांनी केले ‘नोटाबंदी’चे स्वागत
By admin | Published: November 17, 2016 2:22 AM