हरीष गुप्तानवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक प्रवीण सिन्हा यांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर आता सीबीआय आणि ‘रॉ’च्या (रिसर्च अँड ॲनालिसिस विंग) प्रमुखांत बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या ३० एप्रिल रोजी सिन्हा निवृत्त होणार होते. सिन्हा यांना मुदतवाढ दिल्यामुळे आता सीबीआयचे सध्याचे संचालक आणि महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जैसवाल यांचा येत्या जूनमधे ‘रॉ’चे संचालक होण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांच्या मते, ‘रॉ’चे विद्यमान संचालक समंत गोएल यांचा कार्यकाळ येत्या जून महिन्यात संपुष्टात येत असून त्यांची वर्णी राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी लागण्याची शक्यता आहे. हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे.सुबोध जैसवाल यांनी यापूर्वी ‘रॉ’मध्ये काम केलेले आहे. पुढील वर्षी जैसवाल सीबीआयमधून निवृत्त होणार आहेत. परंतु, जर जैसवाल यांची ‘रॉ’मध्ये संचालकपदी नेमणूक झाली तर त्यांना दोन वर्षांचा कालावधी मिळेल. सीबीआय आणि रॉ या दोन्ही संस्थांच्या कामकाजावर पंतप्रधान मोदी समाधानी असून या तीनही अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिन्हा यांना मुदतवाढ देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, इंटरपोलच्या आशियातील कार्यकारी समितीच्या निवडणुकीत सिन्हा यांनी चीनच्या प्रतिनिधीचा पराभव केला. ही नेमणूक तीन वर्षांची असून, सिन्हा निवृत्त झाले तर या महत्त्वाच्या जागेवर भारताला पाणी सोडावे लागले असते.
सुबोध जैसवाल ‘रॉ’चे प्रमुख होणार?, जूनमध्ये सूत्रे हाती घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 9:15 AM