- हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे सीबीआयचे नवे प्रमुख असू शकतात.सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ज्या तीन नावांचा या पदासाठी विचार सुरू आहे, त्यात जयस्वाल यांचे नाव आहे. उच्चाधिकारप्राप्त समितीकडून ज्या अन्य दोन नावांची निवड झाली आहे, त्यात आंध्र प्रदेश केडरचे व्ही. के. कौमुदी (सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात कार्यरत) आणि बिहार केडरचे अधिकारी कुंवर राजेश चंद्रा (सध्या सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख) यांचा समावेश आहे.या नावांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थाना आणि एनआयएचे महासंचालक डॉ. वाय. सी. मोदी यांचा समावेश नाही, हे विशेष. असे समजते की, अस्थाना आणि मोदी यांच्या नावावर सहमती झाली नाही; कारण, या दोघांच्या नावाबाबत काही विवाद होते. अचानक झालेल्या घडामोडीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेल्या उच्चाधिकार समितीने या पदासाठी जयस्वाल, कौमुदी आणि राजेश चंद्रा यांची निवड केली. आता या तीन नावांपैकी एकाची निवड मंत्रिमंडळ समिती (नियुक्त्या) लवकरच करेल. १०९ अधिकाऱ्यांमधून या तिघांची निवड झाली आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याचे संचालक आलोक वर्मा यांच्याशी क्षुल्लक भांडण झाल्यावर अस्थाना यांना सीबीआयमधून दूर करण्यात आले. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना डॉ. वाय. सी. मोदी यांनी क्लीन चिट दिली होती. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलींची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) झाली, त्याचे प्रमुख वाय. सी. मोदी होते.
सुबोधकुमार जैस्वाल नवे सीबीआय प्रमुख? उच्चाधिकारप्राप्त समितीकडून निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 8:24 AM