ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी, माजी क्रिकेटपटू व खासदार नवज्योतसिंग सिद्धू आणि ऑलिम्पिप पदक विजेती बॉक्सर मेरी कोम यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे, असे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत नामांकनाद्वारे पाठवण्यात येणा-या सदस्यांसाठी केंद्र सरकार या तिघांसह आणखी काही नावांची शिफारस करणार असल्याचे समजते. त्यामध्ये मल्याळम अभिनेता सुरेश गोपी, पत्रकार स्वपन दासगुप्ता, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचाही समावेश असेल, अशा माहिती मिळत आहे.
काँग्रेससाठी अडचणी निर्माण करणारे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव राज्यसभेसाठी नक्की पुढे पाठवण्यात येणार असल्याचे समजते. तर भाजपावर नाराज असणा-या नवज्योतसिंग सिद्ध यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या नावाचीही शिफारस करून एक दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपाचा विचार असल्याचे समजते. सिद्धूंचे नाव पुढे केल्याने ते आम आदमी पक्षात प्रवेश करून पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलासमोर अडचणी निर्माण करण्याची संधी संपुष्टात येईल आणि दुसरे म्हणजे त्यांच्या रुपाने पक्षाला राज्यसभेत एक चांगला वक्ताही मिळेल.
राज्यसभेत सध्या ७ जागा रिकाम्या असून सरकारला त्यासाठी सदस्यांची नावे नामांकित करायची आहेत. याप्रकरणी अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.