ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून तातडीने हटवावे अशी मागणी करणारे पत्र भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहिले आहे. या दोन पानी पत्रात स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर कठोर टीका करत राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच स्वामी यांनी ' राजन हे देशासाठी योग्य व्यक्ती नाहीत' असे सांगत त्यांना गव्हर्नरपदावरुन काढून टाकावे असे वादग्रस्त विधान केले होते.
पंतप्रधान मोदींना लिहीलेल्या पत्रातही त्यांनी राजन यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ' "डॉ. राजन हे आपल्या धोरणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला उध्वस्त करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करत असून ते पाहून मला धक्का बसला आहे', असे स्वामींनी पत्रात म्हटले आहे. तसेच ' राजन हे मनापासून भारतीय नसून ते केवळ ग्रीनकार्डधारक म्हणून ते देशात वास्तव्यास आहेत,' असेही स्वामी यांनी म्हटले आहे.
राजन त्यांच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शिकागोला परत पाठविण्यात यावे, अशी जोरदार टीका गेल्या आठवड्यात स्वामींनी केली होती. रघुराम राजन यांनी परदेशी बँकांनी भारतात शाखा उघडणे बंद केले आहे. भारताता शाखा सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार नाही असे त्यांना वाटते असे विधानही केले होते. आरबीआय गव्हर्नर राजन हे देशासाठी योग्य व्यक्ती नाही असेही त्यांनी म्हटले होते.