नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. फारूक अब्दुल्ला यांनी अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली असतानाच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत आणि चीनच्या सीमा प्रश्नाकडे लक्ष वेधत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का, असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर देशातील विरोधक आणि शेतकरी आंदोलकांनी एकच जल्लोष केला. तर हा निर्णय आगामी पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आल्याची टीकाही करण्यात आले आहे. यातच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का?
चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का आणि चीनच्या ताब्यात असलेली प्रत्येक इंच परत मिळवण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का?, अशी विचारणा सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून सुब्रमण्यम स्वामी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तसेच नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला चीन नाही, असा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी केला होता.
दरम्यान, शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठे नाही, हे उशिरा का होईना पण सरकारला कळले आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी उभे ठाकतात आणि सत्ताधाऱ्यांना झुकावेच लागते हे सरकारला कळले आहे. याचा आनंद आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकवटले याचाही आनंद आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी एकदाही बॉर्डवर गेले नाहीत. शेतकऱ्यांना भेटले नाहीत. आज अचानक त्यांना कशी काय जाग आली? प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का, केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली.