नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ नेता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे.
पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था, काश्मीर आणि राम मंदिर मुद्यावर घेतलेल्या निर्णयांची आठवण करुन देत येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी त्यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "पी. व्ही. नरसिंह राव यांनी फक्त अर्थव्यवस्था सुधारली नाही तर संसदेत काश्मीर मुद्यावर प्रस्ताव पारित केला. तसेच, सुप्रीम कोर्टात सांगितले की, जर वादग्रस्त जमिनीवर पहिल्यांदा मंदिर होते. त्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशिद बांधण्यात आले. तर सरकार हिंदुना जमीन देईल."
दरम्यान, याआधीही तेलंगण सरकार पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. भारताला 1990 साली आपले सोने गहाण टाकून परकीय चलनाची गरज भागवावी लागली होती. त्यामुळे पी. व्ही. नरसिंह राव यांनी ही अर्थव्यवस्था बदलून मुक्त अर्थव्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण दिले. 25 जुलै 1991रोजी त्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडले. तो दिवस देशात आर्थिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा होत आहे.