नवी दिल्ली : देश सध्या दोन मोठ्या आव्हानांचा सामना करत आहे. एकीकडे केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे भारत-चीन सीमेवर तणाव कायम आहे. भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कोअर कमांडर स्तरावरील अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या सर्व परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाष्य केले आहे. (BJP MP Swamy Statement on India China Border Dispute)
सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीन सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एक निवेदन सादर करणे गरजेचे आहे, असे सांगत शेतकरी आंदोलनावर फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुब्रमण्यम स्वामींचे मोदींना पत्र
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शेतकरी आंदोलन समाप्त व्हावे, यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रामुख्याने तीन सूचना केल्या आहेत. कृषी कायदे देशभरात लागू केले जाऊ नयेत. ज्या राज्यांना कृषी कायदे करायचे आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडे पत्र व्यवहार करावा. याशिवाय जी राज्ये हे कायदे लागू करणार नाही, त्यांना यातून मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवता कामा नये, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त
सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे म्हटले आहे की, आंदोलक शेतकऱ्यांची किमान आधारभूत किमतीची मागणी रास्त असून, ती मान्य केली पाहिजे. धान्य खरेदी कृषी निगडीत व्यापारापर्यंत मर्यादित केली पाहिजे. या सूचना अमलात आणल्यास शेतकरी आंदोलन समाप्त होईल, असा विश्वास सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
'जय श्रीराम'च्या घोषणेने ममता दीदी नाराज का होतात; जेपी नड्डा यांचा थेट सवाल
दरम्यान, गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र, त्या सर्व निष्फळ ठरल्या. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत, तर काही झाले तरी कायदे रद्द करणार नाही. यावर केल्या जाणाऱ्या सूचनांवर विचार केला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततेत पार पडले. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी यावेळी व्यक्त केला.