संसदेच्या अधिवेशनाचा वेळ गदारोळामुळे वाया गेल्याने एनडीएच्या सर्व खासदारांनी वेतन आणि भत्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वेगळा सूर आळवला आहे. संसदेचे कामकाज चालले नाही. यामध्ये माझा काय दोष?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.संसदेच्या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. 'संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. यामध्ये माझी काय चूक?,' असा प्रश्न स्वामी यांनी विचारला आहे.'मला राष्ट्रपतींनी खासदारपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती याविषयी काही भाष्य करत नाहीत, तोपर्यंत वेतन न स्वीकारण्याबद्दल मी काही बोलू शकत नाही,' असे स्वामी यांनी म्हटले. गदारोळामुळे संसदेचे कामकाज होऊ न शकल्याने अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेल्याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीत उमटले. या बैठकीत बहुतांश खासदारांनी वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडली. यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. त्यामुळे एनडीएचे खासदार २३ दिवसांचे वेतन आणि भत्ते स्वीकारणार नसल्याचा निर्णय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी जाहीर केला. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे.
'संसदेचा वेळ माझ्यामुळे वाया गेला नाही, मी वेतनावर पाणी सोडणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 11:34 AM