श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनावर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी मोदी सरकारकेड तिकडे भारतीय सैन्य पाठविण्याची मागणी केली होती. यामुळे श्रीलंकेतही मोठी खळबळ उडाली होती. यावर भारताने स्वामींना स्पष्ट शब्दांत नाही, असे उत्तर दिले आहे.
भारतीय उच्चायोगाने म्हटले की, अशा प्रकारची मागणी आणि विचार ही भारत सरकारच्या अधिकारीक स्थितीला धरून नाहीत. भारत कोणतेही सैन्य श्रीलंकेत पाठविणार नाही, असे म्हटले आहे. स्वामी हे राजपक्षेंचे समर्थक आहेत. त्यांनी अशी मागणी केल्याने श्रीलंकेत तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली होती.
भारतीय उच्चायुक्तांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "भारतीय उच्चायुक्तालयाने श्रीलंकेत भारतीय सैन्य पाठवण्याबाबत मीडिया आणि सोशम मीडियावरील दावे पूर्णपणे फेटाळले आहेत. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने काल स्पष्टपणे सांगितले होते की भारत लोकशाही, आर्थिक परिस्थितीची पुनर्स्थापना आणि श्रीलंकेतील स्थिरता याला पूर्ण पाठिंबा देतो.''.
काय होती स्वामींची मागणी....भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारकडे श्रीलंकेमध्ये आंदोलन शमविण्यासाठी भारतीय सैन्याला पाठविण्याची मागणी केली होती. श्रीलंकेतील परिस्थिती सुधारण्यासाठी भारतीय सैन्याला पाठविण्यात यावे, एका शेजारी देशातील पंतप्रधानांचे घर जाळण्यात आले आहे, मृत खासदारावर गोळ्या झाडण्यात आल्या. याचा अर्थ असे आंदोलक कोणत्याही दयेसाठी पात्र नाहीत. आपण आपल्या शेजारी आणखी एक लिबिया बनण्याची वाट पाहू शकत नाही, असे स्वामी म्हणाले होते. श्रीलंकेमध्ये शूट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू, श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी जनतेवर गोळ्या चालविण्यास नकार दिला आहे. आतापर्यंत श्रीलंकेत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २१९ जण जखमी झाले आहे. मृतामध्ये एका खासदाराचाही समावेश आहे.