नवी दिल्ली - भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला टार्गेट केले आहे. स्वामींनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ''नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि जीडीपीवर प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे दाखवण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय सांख्यिकी विभागाच्या अधिकाऱ्यांवर सातत्याने चांगले आकडे देण्यासाठी दबाव आणते'', असा खळबळजनक आरोप यावेळी स्वामींनी केला आहे.
सर्व आकडे बनावट असल्याचेही ते म्हणालेत. दरम्यान, स्वामी यांच्या या खळबळजनक आरोपामुळे मोदी सरकारसमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. स्वामी हे अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाऊंटंटच्या एका परिषदेला मार्गदर्शन करत असताना त्यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे. ''कृपा करुन जीडीपीच्या तिमाही आकडेवारीवर जाऊ नका. ही सर्व आकडेवारी बनावट आहे. माझ्या वडिलांनीच सांख्यिकी विभागाची स्थापना केली होती, म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. हल्लीच मी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्यासोबत तेथे गेलो होतो.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर आकडेवारीचा अंदाज कसा काढला, असा प्रश्न मी सांख्यिकी विभागाच्या संचालकांना विचारला होता. यावर, आम्ही काय करणार? आम्ही दबावात होतो. त्यांनी आकडे मागितले आम्ही दिले. त्यामुळे तिमाही आकड्यांवर विश्वास ठेऊ नका, असे यावेळी स्वामी यांनी सांगितले. मूडिज्, फिचसारख्या आर्थिक संस्थांवरही विश्वास ठेऊ नका, असा सल्लाही स्वामींनी चार्टर्ड अकाऊंटंट यांना दिला. अशी आकडेवारी तुम्ही पैसे देऊन मिळवू शकता. विशेष म्हणजे मुडीजने नुकताच भारताला चांगले रेटिंग दिले होते.