नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये भारतात किती वेळा युद्ध झाले आणि देशातील लोकांना स्वातंत्र्य कसे मिळाले, याबद्दल सांगितले आहे. तसेच, वाद उद्भवू शकणाऱ्या एका युद्धाचा उल्लेख करत हिंदुत्वासाठी युद्ध १६ मे २०१४ पासून सुरू झाले, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. दरम्यान, १६ मे २०१४ ला पहिल्यांदा काँग्रेसला पराभूत करून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्यात आले.
"ब्रिटीश साम्राज्यवादापासून भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध १८५७ मध्ये झाले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी दुसरे युद्ध झाले. देशातील छुप्या पश्चिमीकरणापासून स्वातंत्र्याचे तिसरे युद्ध १५ ऑगस्ट १९४७ रोजी सुरु झाले आणि १६ मे २०१४ रोजी हिंदुत्वासाठी युद्ध सुरू झाले", असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी हे नेहमीच हिंदूंच्या अधिकाराविषयी बोलत असतात. राम मंदिर बांधण्यासाठी त्यांनी मोठा आवाज उठविला होता. याआधी हिंदूंचा मूलभूत अधिकार मुस्लिमांच्या संपत्तीच्या अधिकारापेक्षा वरचा आहे, कारण हा साधारण अधिकार आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.
याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमामध्ये मंचावरुनच राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा करावी अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती.
सुब्रमण्यम स्वामी यांसदर्भात ट्विट केले होते. त्यामध्ये "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येमधील मंचावरुन राम सेतू हे राष्ट्रीय स्मारक असल्याची घोषणा करावी. हा सेतू स्थळे व अवशेष अधिनियमाअंतर्ग येणाऱ्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करतो. तसेच, सर्वोच्च न्यायलायामध्ये मी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भातील सुनावणीदरम्यान 2015 मध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही असे नमूद करण्यात आले होते. यासंदर्भातील संस्कृती मंत्रालयाने दिलेली फाईल पंतप्रधानांच्या टेबलवर आहे" असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले होते.