नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्वामी यांनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री शशी थरुर यांना टार्गेट केलं. वो नीच आदमी है, असा टोला त्यांनी थरुर यांचे नाव न घेता लगावला. थरुर यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत वक्तव्य केलं होतं. कुठलाही सच्च्या हिंदुला विवादीत जागेवर राम मंदिर नको आहे, असे थरुर यांनी म्हटले होते.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018''मध्ये राम मंदिराबाबत विधान केलं होतं. कोणत्याही सच्च्या हिंदूला वादग्रस्त जागेवर राम मंदिर नको आहे. हिंदू लोक अयोध्येत भगवान रामाचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे कोणत्याही ख-या हिंदू व्यक्तीला दुसऱ्याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधलं जावं, असं वाटणार नाही, असे थरुर यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपानंही शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यातच, आता सुब्रमण्यम स्वामी यांनी नाव न घेता थरुर यांना चक्क नीच म्हटले आहे. अशा व्यक्तीच्या विधानावर आपण काय बोलणार, ज्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल आहे. ती व्यक्ती नीच आहे, अशा शब्दात सुब्रमण्यम स्वामी यांची जीभ घसरली आहे. दरम्यान, यापूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबात अशाच शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर, काँग्रेसने काही काळासाठी त्यांचे पक्षातून निलंबन केलं होतं.