नवी दिल्ली - केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या निर्णयात मोठा बदल केल्याचं आज (1 एप्रिल) जाहीर केलं आहे. तसेच, गतवर्षात असलेले व्याजदरच कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यानंतर, एका ट्विटर युजर्सने शेअर केलेली बातमी पाहून भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसेच, मोदी सरकारला खोचक टोमणाही लगावलाय.
अर्थमंत्र्यांच्या आधीच्या निर्णयानुसार बचत खात्यातील रकमेवरील व्याजदर 4 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांवर करण्यात आला आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफवरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 6.4 टक्के करण्यात आले. एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजदर हा तिमाहीला 5.5 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनांवरील व्याजदरातही कपात करण्यात आली होती. मात्र, सोशल मीडियातून या निर्णयाला चांगलाच विरोध पहायला मिळाला. त्यानंतर, आज सकाळी-सकाळीच अर्थमंत्र्यांनी ट्विट करुन कालचा व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.
अर्थमंत्र्यांनी निर्णय मागे घेतल्याची माहिती देताच, भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी अर्थमंत्र्यांसह संपूर्ण मोदी सरकारवरच टीका केलीय. आश्चर्य ! हा केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे की, संपूर्ण मंत्रिमंडळच असंय? असा खोचक सवाल सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरुन एका युजर्संला टॅग करुन विचारलाय. कारण, या ट्विटर युजर्संने यासंदर्भातील बातमी शेअर केली होती.
अर्थमंत्र्यांचं ट्विट
निर्मला सीतारामन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कपात होणार नाही, २०२०-२१ च्या अंतिम तिमाहीमध्ये जे दर होते ते यापुढेही कायम राहतील. छोट्या योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने परत घेतला आहे असं त्यांनी माहिती दिली.
काय होता निर्णय?
अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी जारी झालेल्या आदेशानुसार, छोट्या योजनांवरील व्याज दर १.१० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, १ एप्रिल २०२१ म्हणजेच आजपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. यात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात (Public Provident Fund) गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारनं धक्का देत व्याज दरात ७० बेसिस पॉईंटची कपात केली होती. पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के होता. परंतु केंद्राच्या निर्णयामुळे तो ६.४ टक्क्यांवर आला होता. मात्र आता पूर्वीप्रमाणेच ७.१ टक्के व्याजदर मिळणार आहे. पाच वर्षांच्या नॅशनल सेविंग्स स्कीमवरील (National Savings Certificate) व्याजदरातही ९० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आधी गुंतवणुकीवर ६.८ टक्के व्याज मिळायचं. हे व्याजदर आता कायम राहणार आहे.