नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात बंदिस्त सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत राय यांना त्यांच्या आईचे अंत्यसंस्कार आणि इतर विधींमध्ये सहभागी होण्यासाठी चार आठवड्यांच्या संचित रजा (पॅरोल) देण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. राय यांच्या आईचे सकाळी निधन झाले.सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर, न्यायमूर्तीद्वय ए.आर. दवे आणि ए.के. सिकरी यांच्या पीठाने आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची परवानगी देण्याबाबत राय यांची विनंती मान्य केली. तिहारमधून रात्री ८.४५ मिनिटांनी त्यांची सुटका झाली. पीठाने सांगितले की, राय यांच्या आईचे लखनौमध्ये निधन झाले असून त्यांनी संचित रजेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना संचित रजेवर मुक्त करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने राय यांच्याशिवाय तुरुंगात बंदिस्त सहाराचे एक संचालक अशोक राय चौधरी यांनाही संचित रजा मंजूर केली आहे. राय यांच्यावर पोलिसांची नजर राहील, असेही न्यायालयाने सांगितले. दरम्यान आपले अशील पळून जाण्याचा अथवा फरार होण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही राय यांचे वकील कपिल सिब्बल यांनी दिली.
आईच्या निधनानंतर सुब्रत राय यांना चार आठवड्यांचा पॅरोल
By admin | Published: May 07, 2016 1:47 AM