देशातील प्रमुख उद्योग समुहांपैकी एक असलेल्या सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सहारा परिवाराचे प्रमुख असलेले सुब्रतो रॉय हे बऱ्याच दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सुब्रतो रॉय यांचे पार्थिव बुधवारी लखनौमधील सहारा शहर येथे आणण्यात येणार आहे. तिथे त्यांना श्रद्धांजली वाहिली जाईल.
सुब्रतो रॉय सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला होता. ते भारतातील प्रमुख व्यावसायिक आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना सहाराश्री या नावानेही ओळखले जात असे. सहारा समुहाने विविध उद्योगांमध्ये आपलं बस्तान बसवलं होतं. तसेच एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक म्हणूनही सहाराला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पुढे सहाराने आयपीएलमध्ये एक क्रिकेट संघही खरेदी केला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरला होता.
गेल्या काही वर्षांपासून सुब्रतो रॉय हे आर्थिक अनियमिततांमुळे अडचणीत सापडले होते. तसेच त्यांच्यावर विविध न्यायालयात खटले सुरू होते. त्यातील एक खटला सर्वोच्च न्यायालयातही सुरू ङोता. तसेच ते जामिनावर बाहेर होते. तर गुंतवणूकदारांचा पैसा परत करण्याबाबत सहारा इंडियाने आपण सर्व रक्कम सेबीकडे परत केली आहे, असा दावा केलेला आहे.