नवी दिल्ली- सीबीएसई बोर्डाच्या दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्यानंतर बोर्ड खडबडून जागे झाले. तात्काळ पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर झाला. त्या निर्णयाचा लाखो विद्यार्थ्यांवर येणारा ताण लक्षात घेऊन ट्विटरसारख्या सोशलमीडियात आधी संताप आणि त्याचवेळी उपरोधिकपणे सरकार आणि बोर्डाला ठोकणाऱ्या, टोचणाऱ्या प्रतिक्रियांचा पूर आला. माजी मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी यांची तणावग्रस्त भावमुद्रांमधील छायाचित्रे वापरत ट्विट आलं...विद्यार्थी...जेव्हा त्यांनी ऐकलं की पुन्हा परीक्षा द्यावी लागणार!मोहनिशनं केलेलं ट्विट टीनएजर मुलांचा संताप विनोदी अंगानं व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करणारे आहे. पालक आपल्या मुलाला अहिंसेचे महत्व समजवून सांगत असतात. तेवढ्यात मुलगा म्हणतो, व्वा आता परीक्षा संपली सुट्टी...तेवढ्यात पालक त्याला धपाटा मारुन म्हणतात...पुनर्परीक्षा कोण देणार? धपाट्याबरोबरच अहिंसेचा उपदेशही उडतो!!अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय...आता सीबीएसईने स्वत:ला देशातील सर्वात मोठे बोर्ड म्हणवू नये...आता हे चुकांचे सर्वात मोठे बोर्ड झाले आहे...विद्यार्थ्यांचा तणाव वाढवणारे!इस्ट इंडिया कॉमेडी या लोकप्रिय कॉमेडीच्या हॅंडलने उपरोधिक प्रतिक्रिया नोंदवली आहे. “या एकाचवेळी एसएससी बोर्डाच्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या मुलांपेक्षा खूप बरे वाटले असेल!” या शब्दांसोबतची चित्रेही बोलकी. सीबीएसई बोर्ड सांगते...आम्ही मुलांना खूप रगडवून अभ्यास करायला लावतो. त्यांना सुट्टीच्या योजना आखू देतो आणि मग आम्ही अचानक पुनर्परीक्षा जाहीर करतो!धीट मारवाडी या ट्विटर हँडलनेही काहीसं खुपणारं विनोदी ट्विट केलंय. स्माइलींपेक्षाही जास्त खिदळणारा एक चेहरा...सोबत लिहिलंय...”आम्ही एसएससी बोर्डाची मुले!”या उपरोधाला राजकीय फोडणीसुद्धा आहेच. खरेतर राहुल गांधींनी त्यांचे ट्विटर हँडल बदलून सरळ सोपे @RahulGandhi हे घेतले आहे. मात्र आजही त्यांच्या जुन्या हॅंडलशी साधर्म्य राखत एक पॅरोडी हँडल सुरु आहे. त्याने ट्विट केलंय...”२८ लाख मुलांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. हा विदारक विनोद आहे. जबाबदार कोण? मोदीजींनी पुस्तक प्रकाशित केले, एक्झाम वॉरिअर...परीक्षा वीर...मात्र ते त्यांच्या स्वत:च्या मार्केटिंगसाठी होते. आता ते कुठे आहेत...नमोच्या स्पेलिंगची फोडही त्यीं भलतीच केलीय N – No, A – Action, M – Melodrama, O – Only.सर्वात भन्नाट ट्विट फिक्सिटची जाहिरात दाखवणारे...सीबीएसई बोर्डापेक्षा फिक्सिट बरे...लिकेज तरी थांबवते. आणखीही बरेच ट्विट आहेत. बरेचसे संताप व्यक्त करणारे...तसेच काही उपरोधाने टोचणारेही!