प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. 1999 मध्ये 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर एका व्यक्तीने सरकारी नोकरीसाठी सातत्याने अनेक प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. एक-दोनदा नाही तर 16 वेळा अपयश आले. यानंतरही राजस्थानच्या बारमेरच्या सनावडा गावातील रहिवासी भंवरलाल मुंढ यांनी हार मानली नाही. अखेर वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी बाजी मारली आणि त्यांना सरकारी नोकरी मिळाली.
पश्चिम राजस्थानच्या बारमेर जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सनावडा येथील भंवरलाल यांची नुकतीच सामाजिक शास्त्रात तृतीय श्रेणी शिक्षक भरती म्हणून निवड झाली आहे. अनेक भरतीत फार कमी गुणांनी मागे असूनही त्यांनी हिंमत हारली नाही. एवढेच नव्हे तर आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे 2010 मध्ये बीएडच्या शिक्षणासोबतच गुजरातमधील उंझा येथे मजुरीचे कामही केले.
10 वर्षे केली मजुरी
भंवरलाल यांनी मजूर म्हणून काम करण्यासोबतच त्यांचा अभ्यासही सुरू ठेवला होता. अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी आपली हिंमत कायम ठेवली. यामुळेच 24 वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली. यामुळे कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. भंवरलाल यांनी सांगितले की, 1999 मध्ये ते 12वीत होते. यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी शिक्षण सोडून 10 वर्षे मजूर म्हणून काम केले.
भंवरलाल यांनी असेही सांगितले की 2013 मध्ये जेल प्रहरीमध्ये लेखी आणि धावण्याची परीक्षा उत्तीर्ण झाले होते, परंतु मेडिकलमध्ये ते बाहेर पडले. 2013 मध्ये रोडवेज कंडक्टर भरतीमध्येही अपयश आले होते. या वर्षी तिसर्या श्रेणीत (शिक्षक भरती) अंतिम निवड झाली, मात्र पात्रतेचा मुद्दा कोर्टात असल्याने जॉइनिंगला स्थगिती देण्यात आली. त्यानंतरही ते प्रयत्न करत राहिले आणि अखेर त्यांना यश आलं. सध्या संपूर्ण परिसरात भंवरलाल यांच्या संघर्षाची चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.