जिद्द असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. काही लोक म्हणतात की, ज्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे आहेत तेच आयएएस होऊ शकतात. गरिबीचा सामना करणाऱ्या किंवा कमी पैशात जगणाऱ्या मुलासाठी हे खूप अवघड आहे. पण असं नाही हे मजुराच्या मुलाने सिद्ध केलं आहे. हिमांशू गुप्ता असं या मुलाचं नाव असून तो आता आयएएस अधिकारी आहे. हिमांशू गुप्ता यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो.
हिमांशू गुप्ता यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं, त्यांनी शाळेत जाण्यासाठी दररोज 70 किमी प्रवास केला. एवढेच नाही तर वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी चहाच्या दुकानात देखील कामही केलं. हिमांशू यांनी आपल्या मेहनतीने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले. त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे. पैसे कमावण्यासाठी त्यांनी चहाची टपरी चालवली.
हिमांशू गुप्ता यांनी 2018 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हा त्याची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) यासाठी निवड झाली. त्यांनी 2019 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि दुसऱ्या प्रयत्नात भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली. आणि त्यानंतर 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्याची भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) निवड झाली.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या फेसबुक पेजवर आपला यशाच्या दिशेने असलेला प्रवास सांगताना हिमांशू गुप्ता म्हणतात - "मी शाळेत जाण्याच्या आधी आणि नंतर माझ्या वडिलांसोबत काम करायचो. शाळा 35 किमी अंतरावर होती, येण्या-जाण्याचे अंतर 70 किमी होते. मी माझ्या वर्गमित्रांसह व्हॅनमध्ये जात असे. जेव्हा जेव्हा माझे वर्गमित्र आमच्या चहाच्या स्टॉलजवळून जात असत तेव्हा मी लपून बसायचो."
"एकदा कोणीतरी मला पाहिलं आणि माझी मस्करी करायला सुरुवात केली. मला 'चायवाला' म्हटलं जाऊ लागलं. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वडिलांना मदत केली. आमचे घर चालवण्यासाठी आम्ही मिळून दिवसाला 400 रुपये कमवायचो."
"माझी स्वप्ने मोठी होती. मी शहरात राहण्याचे आणि माझे आणि माझ्या कुटुंबासाठी चांगले जीवन जगण्याचे स्वप्न पाहिले. पप्पा अनेकदा म्हणायचे, स्वप्न साकार करायचे असेल तर अभ्यास कर. तर मी तेच केलं. मला माहीत होतं की जर मी खूप अभ्यास केला तर मला प्रतिष्ठित विद्यापीठात प्रवेश मिळेल. पण मला इंग्रजी येत नव्हते, म्हणून मी इंग्रजी चित्रपटाच्या DVD विकत घ्यायचो आणि शिकण्यासाठी त्या बघायचो."