Success Story : जर मनामध्ये जिद्द आणि संकटांशी दोन हात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर सर्व काही यशामध्ये बदलण्यात वेळ लागत नाही. माणसाची जिद्द ही परिस्थितीला नमवण्यास सक्षम असते. उराशी बागळलेल्या स्वप्नांना संघर्षाची प्रामाणिक साथ मिळाली तर तुमच्या यशापुढे आभाळही ठेंगण वाटेल. अशाच एका यशस्वी उद्योजिकेचा संघर्ष आपण जाणून घेणार आहोत.
अवघ्या ५० पैश्यांमध्ये चहा विकून परिवाराचे पालन-पोषण करणाऱ्या पेट्रिसिया नारायण हे नाव तुम्हाला माहिती नसेलच. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत पेट्रिसिया यांनी उद्योगजगतात उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांचा हा संघर्ष आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देणार आहे.
चेन्नईमधील एका ख्रिश्चन कुटुंबामध्ये पेट्रिसिया यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती फार बेताची होती. पेट्रिसिया यांनी वयाच्या १७ व्या वर्षी एका ब्राम्हण मुलासोबत लग्न केले. पण त्याचं नाते काही फार काळ टिकले नाही. १ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर त्यांनी या नात्याला पूर्णविराम द्यायचे ठरवले. पण संघर्ष हा पेट्रिसिया यांच्या पाचवीलाच पूजलेला जणू. दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. संकटांना घाबरून न जाता परिस्थितीशी लढण्याची उमेद त्यांनी मनामध्ये कायम जागी ठेवली.
अडचणींवर मात करत व्यवसायाची उभारणी :
आपल्या वडिलांच्या घरी आश्रितासारखे राहून जीवन जगणे पेट्रिसिया यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हात मिळेल ते काम करायचे ठरवले. पण हाती पैसा नव्हता, अखेर स्वत: च्या आईकडून काही पैसै उधार घेऊन आंब्याचे लोणचे विकायचे त्यांनी ठरवले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी चेन्नईच्या मरीना बीचवर चहाचा ठेला लावला. दिवसेंदिवस गिऱ्हाईकांची संख्या वाढत गेल्याने पेट्रिसिया यांचा व्यवसाय विस्तारत गेला. पहिल्या दिवसाला ७०० रुपयांची कमाई ते आजच्या घडीला कोट्यवधींची मालकीण बनलेल्या पेट्रिसिया यांच्या कष्टाची महती यातून कळते.
भारत सरकारकडून सन्मान :
१९९८ मध्ये संगीता नावाच्या रेस्टॉरंटसोबत पार्टनरशिप करत त्यांनी बिजनेसकडे वाटचाल केली. तसेच २००६ मध्ये आपल्या मुलाच्या साहय्याने पेट्रिसिया यांनी संधीपा नावाचे स्वत:च्या मालकीचे रेस्टॉरंट सुरू केले. आज जवळपास या रेस्टॉरंटच्या माध्यमातून पेट्रिसिया दिवसाला २ लाखांपेक्षा अधिक नफा कमावतात. भारत सरकारने २०१० साली पेट्रिसिया यांना फिक्की वुमेन इंटरप्रेन्योर पुरस्काराने सन्मानित केले आहे.