जीवनातील संकटांशी लढण्यासाठी कठोर परिश्रम आणि दृढ निश्चय आवश्यक आहे, असं म्हणतात. एकामागून एक समोर आलेल्या संकटांसमोर हार न मानता जिद्दीने एका मुलीने कमाल करून दाखवली आहे. प्रेरणा सिंह असं या मुलीचं नाव असून तिने NEET सारखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. प्रेरणाला NEET UG मध्ये 686 गुण मिळाले आहेत, ज्यामुळे तिला 1033 वा रँक मिळाला आहे. तिची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...
प्रेरणा सिंहचे वडील बृजराज सिंह हे ऑटो चालक होते. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर होती. पण 2018 मध्ये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रेरणा त्यावेळी दहावीत शिकत होती, त्याच वर्षी तिच्या वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. प्रेरणाने सांगितलं की आपल्या वडिलांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करण्यात आले होते. यामध्ये तीन लाख रुपये खर्चही करण्यात आले, मात्र कोणताही फायदा झाला नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली.
वाईट काळात प्रेरणाच्या आईने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या निधनानंतर कोरोनाचं संकट आलं, त्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली. एकेकाळी केवळ नातेवाईकांच्या मदतीने आणि आईकडून येणारे 500 रुपये पेन्शन यांच्या जोरावर घर चालू लागलं. इतर भावंडांचे शिक्षण असंच झाले. या काळातही प्रेरणाने अभ्यास सोडला नाही. ती दहा ते बारा तास अभ्यास करायची आणि कोचिंगनंतर उजळणी करायची. यावेळी शिक्षकांचे मनोबलही उंचावले.
प्रेरणा सांगते की, तिच्या वडिलांनी नेहमीच तिच्यावर विश्वास ठेवला. आपली मुलगी आपल्या नावाचा गौरव करेल असे ते म्हणायचे. त्या काळात प्रेरणा फक्त अभ्यासात सरासरी होती, पण तरीही तिच्या वडिलांनी तिला अभ्यासात कोणतीही अडचण येऊ दिली नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रेरणाने ठरवले की ती आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करेल. तिला डॉक्टर व्हायचे होतं आणि वडिलांच्या निधनानंतर तिने हेच ध्येय बनवले.
प्रेरणाची आई माया कंवर यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली. ही सर्व परिस्थिती पाहता त्यांची मुलंही त्यांच्या वेळेआधीच मोठी झाली. कधी कधी घरात भाजी नसताना चपातीसोबत कांदा किंवा लसूण चटणी खाऊन जगायचे. आई रोजचे दहा रुपये जरी देत असली तरी प्रेरणा बरेच दिवस जपून ठेवायची आणि अभ्यास करायची. या सगळ्यात प्रेरणाच्या कुटुंबाला कर्जाच्या ओझ्याला सामोरे जावे लागले. वडिलांनी कुटुंबासाठी आणि घरासाठी कर्ज काढले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला 27 लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे समोर आले.
बृजराज सिंह यांच्या निधनानंतर घराचा हप्ता भरता आला नाही, त्यामुळे बँकर्सनी त्यांना नोटीस पाठवली. नंतर इकडून तिकडून काही हप्ते जमा केले. प्रेरणा अनेकदा उपाशी राहिली पण तिने अभ्यास करणं थांबवलं नाही. प्रेरणाला एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर पीजी करायचे आहे. त्यानंतर तिला वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करायचे आहे. कॅन्सरसारख्या आजाराचा अधिक खोलवर शोध घेणं आणि रुग्णांना वाचवणं अशी तिची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.