ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - रामेश्वरममधील एका नावाडाच्या घरात जन्मलेले अब्दुल कलाम यांनी कठीण परिस्थितीवर मात करत यशाची असंख्य शिखरे सर करत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा झेंडा रोवला. कलाम यांच्या रामेश्वरम ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अाबुल पकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. कलाम यांचे वडिल हे नावाडी होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कलाम यांचे बालपण गेले असून कलाम यांनी वर्तमानपत्र विकून कुटुंबात आर्थिक हातभार लावला. शाळेपासून त्यांना गणिताची आवड होती. रामनाथपुरम येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कलाम यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून सायन्सचे शिक्षण घेतले. मद्रासमधील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजमध्ये त्यांनी एरोनॉटिक्सचे धडे गिरवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (डीआरडीओ) काम केले. या दरम्यान कलाम हे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या संपर्कात आले. साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कलाम यांची कारकिर्द बहरत गेली. नासात प्रशिक्षण घेऊन परतल्यावर कलाम यांनी स्वदेशी मिसाइल तयार करण्याचा विडाच उचलला. मिसाइल निर्मितीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. इस्त्रोत काम करत असताना त्यांनी सॅटेलाईट लाँच व्हेईकल मोहीमेत मोलाचे योगदान दिले. इस्त्रोनंतर त्यांची डीआरडीओच्या प्रमुखपदी निवड झाली व कलाम नामक मिसाइल मॅनने भारतात मिसाइल निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्रिशुल,आकाश व नाग मिसाइलची त्यांनी निर्मिती केली. याशिवाय पृथ्वी क्षेपणास्त्र, अर्जून रणगाड्याच्या निर्मीतमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात रमणारे अब्दुल कलाम हे बहुरंगी व्यक्ती होती. कवी, उत्तम वक्ता व मुख्य म्हणजे सदैव प्रसन्न मुद्रा ही त्यांची ओळख होती. २००२ ते २००७ या कालावधीत त्यांनी भारताचे राष्ट्रपतीपदही भूषवले होते. विविध विद्यापीठांनी डीलिटची पदवी देत त्यांचा गौरव केला आहे. पोखरणच्या अणुचाचणीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. विंग्स ऑफ फायर, इंडिया २०२०, द सायंटिफिक इंडियन अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे.