प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य होतात. अनेक जण व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहतात. पण काही वेळा भांडवल आणि इतर अडचणींमुळे ते शक्य होत नाही. फारच कमी लोकांना यामध्ये यश येतं अशीच एक घटना आता समोर आली आहे. कॉलेजमधल्या तीन मित्रांनी दोन लाख गुंतवून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि आता त्यांच्या व्यवसायाची कोट्यवधींची उलाढाल आहे. ऑनलाईन बेकरी स्टार्टअप कंपनी बेकिंगोच्या यशाची ही गोष्ट आहे. हिमांशू चावला, श्रेय सहगल आणि सुमन पात्रा या तीन महाविद्यालयीन मित्रांनी केवळ 2 लाख रुपये गुंतवून याची सुरुवात केली
हिंमाशू, श्रेय व सुमन या तिघा मित्रांचं 2006 मध्ये नवी दिल्ली येथील नेताजी सुभाष विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर तिघांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरीही केली. 2010 मध्ये फ्लावर ऑरा नावाने कंपनी सुरू केली. फुलं, केक, भेटवस्तू अशा वस्तूंशी संबंधित ऑनलाईन सेवा देण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘दी विकेंड लीडर’च्या रिपोर्टमध्ये सुमन यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यवसायाची सुरुवात ग्रुरूग्राम येथील एका इमारतीच्या तळमजल्याच्या ठिकाणावरून करण्यात आली.
व्हॅलेंटाइन डे कंपनीसाठी ठरला महत्त्वाचा
गुंतवून फेब्रुवारी 2010 मध्ये फ्लॉवर ऑरा कंपनी फक्त 2 लाख रुपये सुरू करण्यात आली. यानंतर एका वर्षाने सुमन या व्यवसायाशी जोडले गेले. अगदी सुरुवातीच्या काळात कंपनीत केवळ एकच कर्मचारी होता. तोच कर्मचारी कस्टमर सर्व्हिस रिप्रझेंटेटिव्हचे काम करण्यासह ऑपरेशन व डिलिव्हरी आदी सर्व गोष्टी सांभाळायचा. 2010 मधील व्हॅलेंटाइन डे कंपनीसाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. त्या दिवशी कंपनीला इतक्या ऑर्डर मिळाल्या की, को-फाउंडर हिमांशू आणि श्रेय यांनाही डिलिव्हरीसाठी जावं लागलं. याच यशामुळे त्यांना वेगळं काही करण्याची प्रेरणा मिळाली. हिमांशू, श्रेय आणि सुमन यांनी वर्ष 2016 मध्ये एकत्र येऊन बेकिंगो नावाने नव्या ब्रँडची सुरुवात केली.
कंपनीत 500 पेक्षा अधिक लोक करतात काम
देशभरातील विविध ठिकाणांवर एकाच ब्रँडचे ताजे केक पोहोचवता यावेत, या विचाराने बेकिंगोचा विस्तार झाला. सध्या ही कंपनी दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांसह मेरठ, पानिपत, रोहतक आणि कर्नालसारख्या छोट्या शहरांतही सेवा देत आहे. कंपनीची 30 टक्के विक्री ही वेबसाइटच्या माध्यमातून होते. तर 70 टक्के विक्री ही स्विगी आणि झोमॅटोच्या माध्यमातून होते. बेकिंगोने 2021-22 मध्ये 75 कोटींपेक्षा अधिक उलाढाल केली. सध्या कंपनीत 500 पेक्षा अधिक लोक काम करत आहेत. कंपनीने यावर्षी दिल्लीत त्यांच्या पहिला ऑफलाइन आउटलेटची सुरुवात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.