वाराणसी : परदेशातील तुरुंगामध्ये कैदेत असलेल्या मुलाला साेडविण्यासाठी वाराणसीतील एका मातेने प्रयत्नांची शर्थ केली. अखेर या प्रयत्नांना यश आले असून चार वर्षांनी तिचा मुलगा भारतात परतला. मुलाला भेटताच या मातेच्या डाेळ्यातून आनंदाश्रू तरळले.
ही गाेष्ट आहे ७५ वर्षांच्या अमरावती देवी यांची. त्यांचा मुलगा महेंद्र हा व्यवसायाने ट्रकचालक आहे. ट्रकमध्ये भाजी घेऊन ताे काठमांडूला जात हाेता. नेपाळच्या हद्दीत वाटेतच एका दुचाकीस्वाराला त्याच्या ट्रकची धडक बसली आणि त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. यासाठी महेंद्रला दाेषी ठरवून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
नेपाळच्या कायद्यानुसार दंड भरून तुरुंगातून सुटका करण्याची तरतूद आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले ७ लाख रुपये अमरावती देवींच्या कुटुंबाकडे नव्हते. तेथूनच त्यांचा संघर्ष सुरू झाला. काेणताही व्हीआयपी वाराणसीला आल्यास त्यांच्या ताफ्यासमाेर त्या मुलाच्या सुटकेसाठी धाव घेत. मात्र, पीएमपासून सीएमपर्यंत काेणीही त्यांची मदत केली नाही. त्यांनी जिल्हा प्रशासनापासून राजदूतावासापर्यंत उंबरठे झिजवले. परंतु, कुठूनही मदत मिळाली नाही.
भीक मागण्याची वेळअमरावती देवींना रस्त्यावर भीक मागताना पाहून अखेर बनारस हिंदू विद्यापीठाचे काही माजी विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी दंडाची रक्कम गाेळा करून मदत केली. त्यांना अर्धीच रक्कम गाेळा करण्यात यश आले हाेते. अखेर त्यांना नेपाळमधील चाैधरी फाउंडेशनची मदत झाली. फाउंडेशनने उर्वरित रक्कम भरली आणि महेंद्र यांची सुटका झाली.