- संजय शर्मानवी दिल्ली - जी-२०च्या यशस्वी आयोजनाबाबत भाजपचे नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले.
आजवर कोणत्याही राज्यात किंवा देशात भाजपच्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत, अभिनंदन भाजप मुख्यालयात भाजपचे नेते व कार्यकर्ते करीत आले आहेत. परंतु, प्रथमच असे झाले आहे की, एखाद्या सरकारी आयोजनाच्या यशस्वितेनंतर अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले आहे. भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्ते नाचत-गात मोदी-मोदीच्या घोषणा देत पंतप्रधानांचे स्वागत करीत होते. यावेळी पंतप्रधान हात उंचावून सर्वांना अभिवादन करत असल्याचे दिसून आले.
पंरपरा मोडली...पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक वेळी असे स्वागत, अभिनंदनानंतर नेहमी कार्यकर्त्यांना संबोधित करत आले आहेत. परंतु, आज पंतप्रधानांनी संबोधित न करता नेते व कार्यकर्त्यांचे हात हलवून अभिवादन करीत स्वीकारले. भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी यांनी कार्यकर्त्यांमध्ये पायी जाऊन त्यांचे स्वागत, अभिनंदन स्वीकारले.
कोणते नेते उपस्थित?भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, नरेंद्र सिंह तोमर, भूपेंद्र यादव, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कैलाश विजयवर्गीय, अरुण सिंह, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
मंत्री, नेते अन् कार्यकर्तेभाजपच्या मध्य प्रदेशबाबत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान भाजप मुख्यालयात आले होते. परंतु, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज पंतप्रधानांचे भाजप मुख्यालयात आल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. भाजप मुख्यालयात मोठ्या संख्येने केंद्रीय मंत्री, खासदार, नेते आले होते.
पोलिसांसाठी पंतप्रधानांकडून स्पेशल डिनर- जी-२० शिखर परिषदेदरम्यान सुरक्षा प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांमधील सुमारे ४५० कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्रीभोजसाठी (डिनर) आमंत्रण दिले आहे.- अधिकाऱ्यांनी सांगितले की, टीममधील पाच-सहा पोलिसांची नावे पाठवण्याची विनंती विभागाच्या प्रभारींना करण्यात आली आहे. वैयक्तिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या असतानाही कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची नावे विशेषत: समाविष्ट करता येतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉन्स्टेबल ते इन्स्पेक्टर दर्जाचे एकूण ४५० पोलिस कर्मचारी पंतप्रधानांसोबत डीनर करण्याची शक्यता आहे.