बंगळुरू : सहकार्याची मनापासून इच्छा असली तर त्याला सीमाच नसते. भारताने दक्षिण आशिया दळणवळण उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करून विभागीय सहकार्यासाठी आकाश ठेंगणे असल्याचा प्रत्यय देत सहकार्याला नवीन आयाम दिला. शेजारच्या दक्षिण आशियायी देशांना भारताने दिलेली बहुमूल्य भेट होय.भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) तयार केलेल्या जी-सॅट-९ (एसएएस) या उपग्रहाचे भारतीय बनवाटीच्या क्रायोजेनिक इंजिनसज्ज जीएसएलव्ही-एफओ-९ द्वारे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी सायंकाळी ४.५७ वाजता या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाला पाठकुळी सवारी (रोड पिग्गीबॅक) असेही म्हटले जाते. हा उपग्रह अचूकपणे भूस्थिर कक्षेत प्रस्थापित करण्यातही यश आले आहे. (वृत्तसंस्था)शेजार देशांना मिळणार अनेक सेवा...५० मीटर लांब आणि २,२३० वजनी हा भूस्थिर दळवळण उपग्रह आहे. दूरसंचार, टेलिव्हिजन, डायरेक्ट-टू-होम, टेली एज्युकेशन आणि टेली मेडिसीनसह शेजारील देशांना अनके सेवा उपलब्ध होतील. विशेष म्हणजे या देशांदरम्यान सुरक्षित हॉटलाईन (संपर्कसेवा) उपलब्ध होणार असल्याने भूकंप, चक्रीवादळ, पूर, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी मोठी मदत होणार आहे. या उपग्रहाची किंमत जवळपास २३५ कोटी रुपये असून, हा सर्व खर्च भारतानेच उचलला आहे. तथापि, एकूण खर्च ४५० कोटी आहे. यामुळे पाकिस्तानवगळता भारत, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवला फायदा होणार आहे. या उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षे असेल.ऐतिहासिक क्षण... वचन केले पूर्ण -मोदीआम्ही दोन वर्षांपूर्वी केलेला वायदा पूर्ण केला. दक्षिण आशिया परस्पर सहकार्याची ही भव्य रुजुवात आहे. दक्षिण आशियातील जवळपास दीड अब्ज लोकसंख्येला याचे अनेक फायदे मिळतील. हा ऐतिहासिक क्षण असून, विभागीय सहकार्याला नवीन आयाम मिळाला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या कामगिरीची प्रशंसा केली. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाची माहिती दिली. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि मालदीवच्या राष्ट्रप्रमुखांनीही भारत आणि पंतप्रधान मोदी यांना याबद्दल धन्यवादही दिले.
दक्षिण आशिया दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By admin | Published: May 06, 2017 1:23 AM