ऑनलाइन लोकमत
ओदिशा, दि. 26 - भारताने ओदिशाच्या व्हीलर बेटावरुन आंतरखंडीय अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या चाचणीमुळे अग्नि-5 क्षेपणास्त्राचा सैन्यदलातील समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. 5 हजार किमी पेक्षा जास्त पल्ला असलेल्या अग्नि-5 उत्तर चीनपर्यंत मारा करु शकते.
चाचणीसाठी जे निकष ठरवण्यात आले होते त्याचे सविस्तर विश्लेषण केले जाईल. काही वेळानंतर ही चाचणी पूर्ण यशस्वी ठरली किंवा नाही ते स्पष्ट होईल असे या प्रकल्पावर काम करणा-या अधिका-यांनी सांगितले. अग्नि 5 ची ही चौथी चाचणी होती. याआधीच्या चाचणीत काही तांत्रिक त्रुटी राहिल्या होत्या. 17 मीटर लांब अग्नि 5 क्षेपणास्त्राची याआधी एप्रिल 2012, सप्टेंबर 2013 आणि जानेवारी 2015 मध्ये चाचणी करण्यात आली होती.
हे क्षेपणास्त्र वाहतुकीसाठी सोपे असून, अपेक्षित लक्ष्य गाठण्यासाठी कुठूनही डागता येईल अशा पद्धतीने विकसित केले आहे. अग्नि-5 क्षेपणास्त्राचा सैन्य दलात समावेश झाल्यानंतर भारताचा अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि इंग्लंड या मोजक्या देशांच्या पंक्तीत समावेश होईल. या देशांकडेच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत.