बालासोर (ओडिशा) : शत्रूने सोडलेले कोणतेही आंतरखंडीय क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता असलेल्या संपूर्णपणे देशी बनावटीच्या स्वनातित (सुपरसोनिक) लक्ष्यभेदी (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी कमी उंचीवर यशस्वी चाचणी घेतली.बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली स्थापित करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून या क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. या क्षेपणास्त्राची महिनाभरातील ही दुसरी चाचणी आहे. फ्लाइट मोडमध्ये (उड्डाणानंतर) क्षेपणास्त्राच्या विविध यंत्रणेची परिमाणे तपासणे हा या चाचणीचा उद्देश होता, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. येथून जवळच असलेल्या चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या प्रक्षेपक केंद्र क्रमांक ३ येथून शत्रू क्षेपणास्त्र म्हणून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राने लक्ष्य केले. लक्ष्य करण्यात येणारे क्षेपणास्त्र चांदीपूर येथून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सोडण्यात आले होते. चार मिनिटांनंतर बंगालच्या उपसागरातील अब्दुल कलाम बेटावर तैनात आधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्राला (लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र) रडारच्या माध्यमातून त्याचे संकेत मिळाले आणि लगेच ते शत्रू क्षेपणास्त्राला हवेत नष्ट करण्यासाठी झेपावले. त्याने येणाऱ्या क्षेपणास्त्राच्या ठिकऱ्या उडविल्या, असे संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या वैज्ञानिकाने सांगितले. लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे असून, ते अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज आहे. यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी शत्रू पक्षाचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र यशस्वीरीत्या अधिक उंचीवर (पृथ्वीच्या वातावरणाहून ५० कि. मी. उंचावर) नष्ट करण्यात आले होते. ओडिशाच्या तटावर ही चाचणी घेतली होती. यापूर्वी या क्षेपणास्त्राची कमी उंचीवरील चाचणी याच ठिकाणी घेतली होती. (वृत्तसंस्था)
देशी बनावटीच्या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By admin | Published: March 02, 2017 4:15 AM