नवी दिल्ली - देशातील लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, दुसरीकडे जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पोलिसांकडून ऑलिंम्पिक विजेत्या खेळाडूंचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे.
नवीन संसद भवनासमोर धडकू पाहणाऱ्या आंदोलक पैलवानांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर पैलवांनाच्या आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून येते. त्यावरुन, खासदार सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आमच्या ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण खूप निराश झालो आहोत. साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर पदकविजेत्या महिला खेळाडूंशी होत असलेलं वर्तन निंदणीय आहे. ज्या खेळाडूंनी आपल्या देशाला खेळाच्या माध्यमातून सन्मान मिळवून दिला, अशा खेळाडूंना न्यायासाठी अशा लढाया कराव्या लागतात, हे खरोखरच दुर्दैवी आहे. ज्या विजेत्यांचा सर्वांनीच ऑलिंपिक विजयानंतर मोठा सत्कार केला होता, मग अचानकपणे न्याय मागणारे हे हिरो खलनायक आहेत का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध नोंदवलाय. तसेच, केंद्रीय गृहमंत्रालयाने आंदोलकांना मारहाण करण्यास पोलिसांना परवानगी दिली होती का? केंद्र सरकारने निःसंदिग्ध उत्तरे द्यावीत, असेही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, कुस्तीपटू संगिता फोगाटला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय साक्षी मलिकला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रीजभूषण शरण सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करा, या मागणीसाठी २३ एप्रिलपासून पैलवान आखाड्याबाहेरील कुस्ती लढत आहेत. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्यावर एफआयर दाखल केला असला तरी आम्ही अटकेवर ठाम असल्याची भूमिका आंदोलक पैलवानांची आहे.