लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारताला लोकशाहीची जननी मानले जाते. आपण सर्व लोकप्रतिनिधी या लोकशाहीच्या मंदिरात बसतो. मात्र संसद, विधानभवनात आमदार, खासदारांचे वर्तन ही चिंतेची बाब झाली आहे. वेलमध्ये घोषणा देणे, कागद फाडून गोंधळ घालणे या माध्यमातून वारंवार संसद स्थगित करायला लावणे ही बाब लोकशाहीसाठी अशोभनीय आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदच्या वतीने बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या संमेलनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, शिवराज पाटील, मीरा कुमार, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड आणि राहुल कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेसाठी देशभरातील १५०० आमदार, ३० विधानसभेचे अध्यक्ष, सभापती आणि ८० मंत्री उपस्थित होते.
मीडिया अजेंडा ठरवतो: देवेंद्र फडणवीस
सध्या मीडियाच लोकप्रतिनिधींचा अजेंडा ठरवतोय, अशी परिस्थिती आहे. आपण कायदे बनवणारे आहोत तेव्हा मीडियाला आपला अजेंडा ठरवू देऊ नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला. विधानसभेत चर्चेअंतीच विधेयके मंजूर झाली पाहिजेत, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.