पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले होते. सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी प्रयागराज येथे त्यांचे पाय धुवून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला होता. मोदींनी ५ सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुत त्यांचा सन्मानही केला होता. मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, भाजपा समर्थकांनी मोदींच्या या कृत्याचं कौतुक करत पंतप्रधानांबद्दल आदर व्यक्त केला. तर, काहींनी टीकाही केली होती. आता ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतही न्यायाधीशांना सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले आहेत.
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील उलुंदुरपेट नगरपालिकेने उलुंदुरपेट न्यायालयाच्या आवारात 'स्वच्छता कामगार विशेष शिबिर' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी न्यायाधीशांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आणि 'पाठपूजा'ही केली. त्यानंतर, त्यांचा सन्मानही केला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. चक्क न्यायमूर्ती आपले पाय धूत असल्याने सफाई कर्मचारी महिलेला गदगदल्यासारखे झाल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. महिलेने चक्क हात जोडून आपली निशब्द भावना व्यक्त केली.