भुवनेश्वर- प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्यावर रविवारी संध्याकाळी अज्ञाताने हल्ला केला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पटनायक यांच्यावर पुरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पुरी जिल्ह्यातील कोणार्क इथं सुरू असलेल्या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवात रविवारी ही घटना घडली. महोत्सवात सहभागी झालेला एक तरुण पटनायक यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या निमित्तानं त्यांच्या मनगटावरील घड्याळ खेचण्याचा प्रयत्न करत होता. हे लक्षात येताच पटनायक यांनी प्रतिकार केला. त्यावेळी त्यानं पटनायक यांच्यावर हल्ला केला आणि काही कळण्याच्या आत तो तिथून पळून गेला. सुदर्शन पटनायक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली आहे. 'माझ्या विद्यार्थ्यांनी व काही मित्रांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तो हाती लागला नाही,' असं त्यांनी सांगितलं.
कोणार्कमधील चंद्रभागा बिचवर पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचं 1 डिसेंबर रोजी उद्धाटन झालं. राज्य पर्यटन विभागाने या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. सुदर्शन पटनायक हे त्या महोत्सवाचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत.
वाळू शिल्पातील कला सादर करायला एकुण 70 कलाकारांनी या महोत्सवात सहभाग घेतला असून त्यामध्ये 18 महिलांचा सहभाग आहे. जर्मनी, मेक्सिको, सिंगापूर, कॅनडा, स्पेन, श्रीलंका, रशिया, घाना येथिल स्पर्धक त्यांची वाळू शिल्पातील कला सादर करणार आहेत.