India-China Dispute : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला भारत-चीन सीमावाद अखेर संपुष्टात आला. लडाखच्या सीमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी एक करार करण्यात आला आहे, ज्याला दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, यावर आता देशाचे माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'भारत आणि चीनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू आहे. लष्करी स्तरावर पूर्वी काही मतभेद होते, पण आता हे एक चांगले पाऊल उचलले गेले आहे. याचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते.'
'भारताचे मोठे यश, पण...'हिंदी वृत्तवाहिनी आजतकशी केलेल्या विशेष संवादात जनरल व्ही के सिंह पुढे म्हणतात, 'या करारानंतर दोन्ही सैन्य डेपसांग आणि डेमचोकबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवतील. परंतू मला असे वाटते की, हे भारताचे मोठे यश आहे, पण स्थानिक स्तरावर लागू होण्यास थोडा वेळ लागेल. अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात आपण राहू नये. करारानंतर भविष्यातील रूपरेषा काय असेल, हे आज सांगणे कठीण आहे. त्याचे काही नियम राजनैतिक आणि लष्करी पातळीवर ठरवले जातील.'
सीमा करारामुळे तणाव कमी होईल का?भारत आणि चीनमधील संबंध प्रदीर्घ काळ तणावपूर्ण होते, परंतु आता दोन्ही देशांनी सीमावादावर काही करार केले आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीन यांच्यात गस्त करार झाला आहे. यामुळे भारतीय सैन्य येथे पुन्हा गस्त घालण्यास सक्षम असेल. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक चकमक झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. पण, आता या करारामुळे सर्वकाही सुरळीत होण्याची शक्यात आहे.
विक्रम मिस्त्री पुढे म्हणाले की, गलवान खोऱ्यातील घटनेनंतर काही गस्त स्थळांवर गस्त बंद करण्यात आली होती, मात्र या ठरावामुळे तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. चीनने काही भागात लष्करी तळही बांधले, ज्यामुळे तणाव आणखी वाढला होता. पण, आता याचे समाधान या ठरावानंतर मिळू शकते. या करारानंतर डेपसांग आणि डेमचोकसारख्या संवेदनशील भागात परिस्थिती सुधारेल.