नवी दिल्ली : मुंबईतील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर सहा वर्षांनी सरकारला सद्बुद्धी झाली असून, मच्छीमारांच्या लहान नौकांचा माग घेणारी उपकरणे लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ मोफत लावण्यात येणाऱ्या या उपकरणांद्वारे नौकांच्या समुद्रातील कारवाया, तसेच सुरक्षेसंदर्भातील संभाव्य धोक्यावर नजर ठेवली जाणार आहे़गत संपुआ सरकारने मच्छीमारांच्या नौकांवर ट्रॅकिंग उपकरणे बसविण्याची योजना आखली होती; मात्र ही उपकरणे बसविण्यासाठी येणारा भरमसाट खर्च, शिवाय मच्छीमारांकडून झालेला करडा विरोध यातच ही योजना रखडली होती़ तथापि, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात मंत्रिमंडळासमक्ष एक प्रस्ताव सादर केला आहे़ २० मीटर लांबीपेक्षा लहान मासे पकडण्यासाठी वापरात येणाऱ्या नौकांवर नि:शुल्क ट्रान्सपॉन्डर लावण्याची मंजुरी देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली होती़ या ट्रान्सपॉन्डरच्या मदतीने समुद्र किनाऱ्यापासून ५० कि.मी. अंतरापर्यंत नौकांचा माग घेता येईल़प्रत्येक ट्रान्सपॉन्डरची अंदाजे १६,८०० रुपये याप्रमाणे अशी सुमारे दोन लाख ट्रान्सपॉन्डर लावण्यासाठी ३३६ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे़ प्रस्तावांतर्गत ट्रान्सपॉन्डर लावण्याचा संपूर्ण खर्च गृहमंत्रालय उचलणार आहे, तर कृषी मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन, दुग्ध व मत्स्यपालन विभागाद्वारे ही योजना लागू केली जाणार आहे़
मुंबई हल्ल्यानंतर सद्बुद्धी
By admin | Published: February 08, 2015 11:49 PM