प्रख्यात उद्योजिका, समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी यासंदर्भात ट्विट करून सूधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे.
प्रख्यात उद्योजक नारायण मूर्ती यांच्या पत्नी असलेल्या सुधा मूर्ती यांनी त्यांच्या सामाजिक कार्य आणि लेखनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचा जन्म १९ मे १९५० रोजी कर्नाटकातल्या शिगगावमध्ये झाला. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीई केलं आहे. त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. २००६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्यांच्या नावावर मोठी साहित्यसंपदा आहे. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं आहे. त्यात ते म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केल्याने मला आनंद होत आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधाजींचे योगदान खूप मोठे आणि प्रेरणादायी आहे. सुधा मूर्ती यांची राज्यसभेमधील उपस्थिती हे नारीशक्तीचं शक्तिशाली उदाहरण आहे. राज्यसभेतील उत्तम कारकिर्दीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.