- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
राजकीय सुडावर माझा व केंद्र सरकारचा विश्वास नाही. गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही सलग १४ वर्षांत आपण कधी सुडाचे राजकारण केले नाही वा राजकीय कारणास्तव कोणत्याही फाइल्स मी हाताळल्या नाहीत. गेल्या अडीच वर्षात केंद्र सरकार अथवा पंतप्रधान कार्यालयावरही असा आरोप कोणी केला नाही. कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय घराण्याशी संबंधित व्यक्तींविरोधात चौकशांचा ससेमिरा सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले नाहीत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.आपल्या सविस्तर मुलाखतीमध्ये पंतप्रधानांनी सुडाचे राजकारण करण्यावर आपला अजिबात विश्वास नसल्यो स्पष्ट केले. आपल्या भूमिकेचे अधिक स्पष्टीकरण करतांना पंतप्रधान म्हणाले, राजकीय घराण्यांना आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका कधीही नव्हती व नाही. त्यामुळे असले आरोप व्यक्तिश: माझ्यावर अथवा सरकारवर करणे अत्यंत चुकीचे आहे. आणखी एक बाब मी स्पष्ट करू इच्छितो की सरकारचा कोणत्याही चौकशी वा तपासाच्या प्रकरणात हस्तक्षेप नाही. कायदा आपले काम करेल, यावर आमचा भरवसा आहे. त्यात कोणतीही व्यक्ती अथवा घराण्याला वाचवण्याचा प्रयत्नही माझे सरकार करणार नाही.काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचे वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरण आणि त्यासाठी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डायांनी सारे नियम धाब्यावर बसवल्याच्या आरोप, यासह अन्य व्यवहारांचीही चौकशी पूर्ण करून न्या. ढिंगरा आयोगाने नुकताच आपला अहवाल दोनच दिवसांपूर्वी हरयाणा सरकारला सादर केला. यानंतर राजकीय क्षेत्रातील वातावरण तापले असून, केंद्र व राज्य सरकार सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेले वरील प्रतिपादनाकडे पाहिले जात आहे.वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने थेट सोनिया गांधींचा उल्लेख करून सुडाच्या राजकारणाविषयी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला असता, नरेंद्र मोदी यांनी उत्तरात कोणाच्याही नावाचा उल्लेख करण्याचे टाळले. मात्र आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन करताना पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी यांनी स्वत:ची तसेच आपल्या सरकारची उपरोक्त भूमिका नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट केली.