Vande Bharat Express Train: देशभरात सुरू असलेल्या ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झालेले असे काही मार्ग आहेत, ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. यामध्ये इंदूर-भोपाळ मार्गाचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे जनक मानले जाणारे सुधांशू मणि यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. इंदूर-भोपाळ या मार्गावर वंदे भारत ट्रेन फेल होणार हे माहिती होते. परंतु, राजकारणामुळे हा निर्णय घेण्यात आला, असा दावा सुधांशू मणि यांनी केला.
इंदूर-भोपाळ मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे व्यवहार्य निर्णय नव्हता. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली, तर ती यशस्वी होऊ शकणार नाही, हे आधीपासून माहिती होते. मात्र, राजकीय कारणांमुळे सदर निर्णय घेण्यात आला. या मार्गावरील अन्य ट्रेनने जायला प्रवाशांना तेवढाच वेळ लागतो. त्या ट्रेनचे तिकीट दरही तुलनेने फार स्वस्त आहेत. अशा परिस्थितीत महाग तिकीट काढून तेवढ्याच वेळात पोहोचण्याचा निर्णय प्रवासी का घेतील, असा उलटप्रश्न विचारत या मार्गाच्या प्रतिसादाबाबत सुधांशू मणि यांनी नाराजी व्यक्त केली. इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत ट्रेन ७० टक्के रिकामी जाते, अशी माहिती देण्यात आली आहे.
तिकीट दर कमी करून मोठे नुकसान होईल
इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, हे चुकीचे ठरेल. तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. एखादी ट्रेन मार्गावर सुरू करण्याआधी मोठा सर्व्हे केला जातो. तो सर्व्हे सकारात्मक असेल, तरच त्या मार्गावर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, याबाबतीत असे घडले नाही, असे सुधांशू मणि यांनी सांगितले.
भविष्यात राजधानी ट्रेन बंद होणार
येत्या ५ वर्षात देशात ५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या मार्गांवर जास्त प्रतिसाद आहे, त्याच मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवावी, असे सुधांशू मणि यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशातील सर्व राजधानी ट्रेन सेवा बंद केल्या जातील. हे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रत्येक राजधानीची जागा वंदे भारत स्लीपर ट्रेन घेणार आहे. यासोबतच रेल्वे स्थानके सुधारण्याचे कामही वेगाने केले जाणार आहे, अशी माहिती सुधांशू मणि यांनी दिली.
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन इंदूर ते भोपाळ या मार्गावर चालवली जात होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या ट्रेनची सेवा नागपूरपर्यंत वाढवण्यात आली. ही ट्रेन इंदूर जंक्शनवरून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटते आणि दुपारी ०२ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. या मार्गावर ६ स्थानकांवर वंदे भारत थांबते. सुमारे ८ तास २० मिनिटांत ६३५ किलोमीटरचे अंतर कापते.