BJP Questions Congress Boycott Politics: अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी गुरुवारी (11 जानेवारी) काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या सर्व कार्यक्रमांची यादीच वाचली. त्रिवेदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले नेहमी नकारात्मक राजकारण करतात आणि प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकतात. त्यामुळेच देशातील जनतेनेही काँग्रेसवर बहिष्कार टाकला आहे. भारताचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने प्रत्येक चांगल्या गोष्टींवर बहिष्कार टाककला आहे.'
'काँग्रेसच्या काळात अनेक घटना घडल्या'काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा संदर्भ देत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'इंदिरा गांधींच्या काळात कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या. राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव यांच्या काळात तर काय नाही ते घडले आणि सोनिया गांधींच्या काळात तर चक्क राम काल्पनिक झाले. हीच काँग्रेसची संस्कृती आहे आणि राम मंदिराला विरोध, हाही त्याचाच एक भाग आहे. बाबरीचे समर्थक राम मंदिराच्या कार्यक्रमात येत आहेत, पण काँग्रेसवाले विरोध करत आहेत.'
'सोमनाथ मंदिरात नेहरू उपस्थित नव्हते''सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता, तेव्हा जवाहरलाल नेहरुंनी 24 एप्रिल 1951 रोजी तत्कालीन सौराष्ट्र प्रमुखांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात नेहरु म्हणाले की, या कठीण काळात हा सोहळा होतोय, यासाठी मी दिल्लीहून येऊ शकत नाही. या सोहळ्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक आहे की, राष्ट्रपती, माझे काही मंत्री आणि तुम्ही या सोहळ्यात उपस्थित आहात. मला वाटते की हे माझ्या देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे नेहरुंनी पत्रात म्हटल्याचे त्रिवेदी म्हणाले.
'नवीन संसद भवन, अभिभाषण, कारगिलवर बहिष्कार टाकला'त्रिवेदी पुढे म्हणाले की, 'काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला होता. जीएसटी लागू झाला तेव्हाही बहिष्कार टाकला. जी-20 दरम्यान जगातील 20 शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख आले होते. यावेळी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमावरही कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला. 2004 नंतर 2009 पर्यंत काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकला.'
'अणुचाचणीवर मौन, प्रणव मुखर्जींच्या सन्मानावरही बहिष्कार''मे 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोखरण अणुचाचणीनंतर काँग्रेसने 10 दिवस कोणतेही वक्तव्य केले नाही. इतकंच काय, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न समारंभावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. प्रणव मुखर्जी त्यांच्याच पक्षाचे होते ना? आता काही ठराविक लोकांच्या मतांसाठी काँग्रेस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. काँग्रेसने राम मंदिरावर बहिष्कार टाकला, त्यामुळे आता जनता त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका त्रिवेदी यांनी केली.