बलवंत तक्षक
चंडीगड : सुफी गायक आणि भाजपचे उमेदवार हंसराज हंस यांना पंजाबच्या शेतकऱ्यांनी फरीदकोटमध्ये घेराव घातला. भाजपने हंस यांना फरीदकोटमधून उमेदवारी दिली आहे. हंस यांचा ताफा येताच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाला घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत कसेबसे शेतकऱ्यांना तेथून हटवले.
आंदोलनानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे तर रद्द केले. मात्र, त्यावेळी मान्य केलेल्या अटी अद्यापही लागू केलेल्या नाहीत. या अटींची आठवण करून देण्यासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांचा हरयाणाच्या सीमेवर छळ करण्यात आला. विदेशी नागरिक असल्याप्रमाणे वागणूक दिली गेली, अशा आरोपांच्या अनेक फैरी झाडून शेतकऱ्यांनी हंस यांना निरुत्तर केले.
अद्याप प्रचाराला वेग नाही यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. फरीदकोटमध्ये आतापर्यंत केवळ भाजपनेच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस, अकाली दल आणि आम आदमी पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतरच येथील निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे. मात्र, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हंस यांना शेतकऱ्यांच्या सततच्या विरोधाला सामोरे जावे लागणार हे निश्चित.