सुरेश भटेवरा। लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील साखर उद्योगावर जीएसटीचा मोठा प्रभाव पडणार असून, तो नेमका काय व कसा असेल, हे बारकाईने समजावून घेऊन या नव्या करप्रणालीसाठी सहकारी कारखान्यांनी सिद्ध व्हावे, असे आवाहन नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी २६२ सहकारी साखर कारखान्यांना व ९ राज्य सहकारी साखर संघांना केले आहे.जीएसटीची १ जुलै २0१७पासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांना त्यासाठी नियोजित वेळेत, व्यवसायाची भौगोलिक व्याप्ती व क्षेत्रासह बदल करून घ्यावे लागतील, असे ते म्हणाले.सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात दिलीप वळसे पाटलांंनी नमूद केले आहे की, पुढील जीएसटीचा साखर उद्योगावर थेट परिणाम संभवतो. साखर कारखाने : (एक्साइज ड्युटी, साखरेवरील सेस, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर) मोलॅसिस : (एक्साइज ड्युटी रुपये ७५0/- प्रतिटन, प्रशासकीय खर्च, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर), बायोगॅस (एक्साइज ड्युटी, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर) तसेच ऊस : (खरेदी कर, प्रवेश कर, वाहतुकीवरील सर्व्हिस टॅक्स, व अन्य कर), साखरेचे पॅकिंग साहित्य, रसायने, दुरुस्ती व यंत्रांची देखभाल व यंत्रसामग्रीसाठी भांडवली खरेदी (एक्साइज ड्युटी, आॅक्ट्रॉय, व्हॅट/ विक्रीकर व राज्य सरकारचे अन्य कर) याप्रकारे करभरणा करीत असतात.या उद्योगावर एक्साइज ड्युटी, साखरेवरील सेस, आॅक्ट्रॉय इत्यादी कर होते. त्याऐवजी आता केवळ जीएसटी भरावा लागेल, हे लक्षात घेऊ न त्याचे सारे तपशील कारखाना व्यवस्थापनाने वेळेपूर्वी समजावून घ्यावेत.
साखर कारखान्यांनी जीएसटीसाठी सिद्ध व्हावे
By admin | Published: June 10, 2017 12:13 AM