बागपत : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला आहे. बागपतमधील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात केले आहे. त्यामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. येथील 154 कि.मी रस्त्याच्या उद्धाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बागपतमधील शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणात केले आहे. त्यामुळे येथील लोकांचे मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे, म्हणून येथील शेतकऱ्यांनी ऊसाव्यतीरिक्त दुसऱ्या पिकांचे उत्पादन घ्यायला हवे, असा अजब सल्ला योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांनी भाजीपाल्याच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करायला हवे, कारण दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याला मागणी आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
याचबरोबर, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारकडून अंमलात आणल्या असल्याची माहिती यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिली. तसेच, यापुढे सुद्धा सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिले.